How to study: अभ्यास कसा करावा? हा प्रश्न विद्यार्थ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. अभ्यास करणे म्हणजे केवळ कठीण परिश्रम नसून ते एक शास्त्र आहे. एक कला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला हे शास्त्र शिकले व शिकविले पाहिजे. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचे परिश्रम, धन, वेळ व आरोग्य यांचा अपव्यय वाचून जीवन आनंदमय व यशस्वी होईल. विद्यार्थ्यांच्या जीवापाड प्रयत्नाला यशाचा सुगंध येईल. म्हणून हा छोटासा उपक्रम हाती घेतला आहे. अभ्यास कसा, केंव्हा, कुठे, किती, कशासाठी करावा वगैरे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांपुढे असतात. थोड्या वेळेमध्ये अधिक व मुद्देसूद अभ्यास करुन परीक्षेत अधिक गुण कसे मिळवावेत, टिपा (नोट्स) कशा घ्याव्यात इत्यादी विषयावर अनेक अनुभवी विद्यार्थी, शिक्षक, व पालकांचा अनुभव पुढे देत आहे. तुम्ही प्रत्यक्ष त्यांचे प्रयोग करून पाहा. हा लेख केवळ विचार नसून प्रत्यक्ष अनुभव आहे.
How to study -अभ्यास कसा करावा?
अभ्यास कशासाठी ?
अभ्यास कशासाठी हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. कारण त्यावरच अभ्यासाची गंभीरता व शैली अवलंबून आहे. अभ्यासाची अनेक प्रयोजने असू शकतात. उदा. करमणुकीसाठी, ज्ञानवृद्धीसाठी, अध्ययन- अध्यापनासाठी, जीवन उत्तम प्रकारे जगण्यासाठी, परीक्षेसाठी, करमणुकीसाठी केलेल्या अभ्यासात खोली/गंभीरता नसते. ज्ञानवृद्धीसाठी केलेल्या अभ्यासात गंभीरता व प्रामाणिकता अधिक असते. शिकवण्यासाठी केलेल्या अभ्यासात खोली व चिकित्सकता अधिक असते. जीवन निर्माण करण्यासाठी केलेल्या अभ्यासात निरंतरता व प्रयोगात्मकता अधिक असते.
परीक्षेसाठी केलेल्या अभ्यासात गंभीरता कमी व कलात्मकता अधिक •असते. न समजतासुद्धा केवळ पाठांतराच्या बळावर परीक्षेत अधिक गुण प्राप्त करणे शक्य आहे. म्हणून अभ्यास कशासाठी या प्रश्नाचे उत्तर अगोदर ठरवूनच अभ्यासाला बसावे. तथापि, ज्ञानवृद्धी, जीवन-निर्माण, व परीक्षा यांचा संगम झाला तर फारच उत्तम आहे. कारण ते परस्पर पूरक आहेत. केवळ ज्ञानासाठी ज्ञानाला कांही अर्थ नाही. परीक्षासुद्धा ज्ञानवृद्धी व जीवननिर्माणासाठीच आहे. परीक्षेसाठी केलेल्या अभ्यासामध्ये ‘जसे प्रश्न तसे उत्तर’ तयार करावे लागते. म्हणून परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारले जाणार आहेत याचा अभ्यास करुन तद्नुरुप उत्तरे देण्यासाठी अभ्यास करावा लागतो. म्हणून, मागील परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्यास, अभ्यासाची शैली, गती व गंभीरता कळते. यामुळे मुद्देसूद (to the point ) अभ्यास होऊन कमी परिश्रमात अधिक गुण मिळविणे शक्य आहे. अभ्यासाचा आटोप येतो व आत्मविश्वास वाढतो.
तीव्र इच्छा (Earnest desire ) :
अभ्यासाद्वारे ज्ञान वाढवून शारीरिक, आत्मिक, व सामाजिक उन्नती करण्याची उत्कट इच्छा निर्माण केली पाहिजे. इंग्रजीमध्ये म्हटलेले आहे, where there is will, there is way.
आवड असली की सवड मिळते. As you think eth so shall you become – इच्छा जितकी तीव्र असेल तेवढेच यश मिळते. ‘नाकाम इरादों से कभी मंजिल हासिल नही होती ।’ जर आपल्या मनात इच्छाच नसेल, तर आपल्या हातून कार्याचा वृक्ष कसा फोफावेल. ‘मन की हारे हार है, मन की जीते जीत।’ उत्साहपूर्वक सुरुवात केली की यश मिळालेच म्हणून समजा. (Well beginning is half done) लोकमान्य टिळक म्हणत असत, ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच,’ आसा दृढनिश्चय केल्यास जगात काहीच असंभव नाही.
ध्येयाचे सतत चिंतन, भविष्य काळातील परिणामांचा आपल्या ध्येयांचा, आपल्या स्वप्नांचा मनोरथांचा विचार करत राहिल्यास त्या ध्येयाला पूर्ण करण्याची अथवा प्राप्त करण्याची इच्छा वरचेवर तीव्र होत जाते. त्यासाठी रोज सकाळी ईश्वरचरणी प्रार्थना करावी, यामुळे ध्येयाचा विसर पडणार नाही. जीवनात निराशा येणार नाही. अहंकार कमी होऊन अंगी नम्रता येईल.
ज्ञान (Right Knowledge) :
ज्ञानाशिवाय जीवनात आनंद नाही अशी पूर्ण खात्री असावी अधिक ज्ञान, अधिक आनंद, अधिक अज्ञान-अधिक दुःख (more the knowledge, more the pleasure, more the ignorance, more the pain) हा उन्नत जीवनांचा मूलमंत्र आहे, तसेच अभ्यास कसा करावा याचेही ज्ञान पाहिजे. कारण अभ्यास करणे एक श्रम नसून ते एक कला/शास्त्र आहे. म्हणून अभ्यास करण्याच्या तीव्र इच्छेबरोबरच
अभ्यास कसा करावा याचेही सम्यक ज्ञान आवश्यक आहे. कठोर परिश्रम (Hard Work) :
कठोर परिश्रम ही यशाची गुरुकिल्ली आहे. साधारण बुद्धीचा माणूससुद्धा सतत परिश्रमाने असाधारण कार्य करुन दाखवू शकतो. ससा व कासवाची गोष्ट तुम्हाला माहीतच आहे. निरंतर परिश्रम हेच कासवाच्या विजयाचे कारण आहे. हुशार मुलांना अतिविश्वास (Over confidence) अथवा अहंकार होतो आणि ते झोपा काढतात. पण लक्षात ठेवा, ‘ Intelligence is nothing but 99% perspiration – (Hard work) ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे.’ या जगात आपोआप कांहीच होत नाही.
कोणतेही काम केल्यानेच होते. केवळ मनोरथाने होत नाही. जसे झोपलेल्या सिंहाच्या मुखात हरीण काही आपोआपच प्रवेश करीत नाही.) म्हणून आपला आदर्श कासव कार्य वा साधयेयं देहं वा पातयेयम्- हा देह पडला तरी हरकत नाही, पण कार्य पूर्ण झालेच पाहिजे. Do or die अर्थात जिंकू किंवा मरु. या बाण्याने कामास लागले पाहिजे. त्यास पर्याय नको. पर्याय आला की कार्य पूर्ण शक्तीने होतच नाही. सिंहगडावर तानाजी मालुसरे पडले तेव्हा मराठे सैनिक कड्यावरील दोरखंडाद्वारे खाली उतरण्यासाठी पळत होते. सूर्याजीने हे ताडले आणि तो दोरखंडच तोडून फेकून दिला अन् सर्व सैनिकांना सांगून टाकले, ‘तुमचा बाप इथे मरुन पडला आहे अन् तुम्ही भागूबाईसारखे पळत आहात. ज्या दोरखंडाच्या (पर्यायाच्या) विश्वासावर पळ काढत आहात तो पर्याय मी केव्हाच तोडून टाकला आहे. आता एकच पर्याय उरला आहे. एकतर लढून किल्ला जिंका व तुमच्या बापाच्या रक्ताचा बदला घ्या अथवा कड्यावरुन उड्या मारून खुशाल मरा.’ पर्याय संपला की, माणूस सारी शक्ती पणाला लावून लढतो, कार्य करतो, असे केले की, यश मिळालेच म्हणून समजा. Try and try do – not ask why? ‘How to study -अभ्यास कसा करावा?’
कल करे सो आज कर:
उद्या वर्गात शिकविले जाणारे सर्व पाठ आज घरुन वाचून जावेत. त्यामुळे पाठ वर्गात अधिक समजतो. लक्ष दुसरीकडे जात नाही. आत्मविश्वास वाढतो. त्याच पाठाला त्याच दिवशी सायंकाळी पुन्हा वाचावे व त्यातील न समजलेला भाग शोधावा. दुसऱ्या दिवशी तो न समजलेला भाग वर्गात गुरुजींकडून अथवा मित्रांकडून जाणून घ्यावा.
त्यामुळे काम सपते परीक्षेच्या पुढे अभ्यासाचा ढीग साचत नाही. रोजचा अभ्यास रोज झाल्यामुळे मनावर अभ्यासाचे दडपण येत नाही. १००% विषय समजतो. त्या विषयात रुची वाढते, पाया मजबूत होतो. या पद्धतीने कमी वेळात अधिक काम होते. वरचेवर अभ्यासाची गती वाढते, यामुळे परीक्षेची भीती वाटत नाही. Action without delay is the soul of efficiency. (अविलंब कार्य करणे कर्मकौशलतेचा आत्मा आहे.) To forgot is a crime. To be lazy is a greater crime.
To neglect the duty and offer excuses is the greatest crime. (आपले कर्तव्यकर्म विसरणे अपराध आहे, आळशी बनणे त्याहीपेक्षा मोठा अपराध आहे, कर्तव्याकडे दुर्लक्ष करणे व त्यासाठी बहाणेबाजी करणे हा तर सर्वात मोठा अपराध) दृढ संकल्प व्यक्तीला जगात काहीच कठीण नाही. अभ्यासाची ही अनुभूत व सर्वश्रेष्ठ रीती आहे.
चर्चा (Discussion) :
चर्चा करुन अभ्यास करावा. त्यामुळे विषय स्पष्ट होतो. स्मरणशक्ती वाढते, अभ्यासाचा आटोप येऊन आत्मविश्वास येतो. फावल्या वेळेचा उपयोग होतो, कारण चालता-फिरता किंवा थकलेल्या वेळीसुद्धा चर्चा होऊ शकते. चर्चेत झोप येत नाही. नवीन ज्ञानात भर पडते. अभ्यासाची ही मनोरंजक पद्धत आहे. विषय आपल्याला खरोखर कळला आहे अथवा कळल्याचा भास होत आहे, हेसुद्धा चर्चेतुन कळते. विद्यार्थ्याच्या दृष्टीने हे फार महत्त्वाचे आहे. जर चर्चेमध्ये काही संशयात्मक वाटत असेल तर तो भाग पुस्तकातून पाहून घ्यावा. चर्चा आपल्यापेक्षा अभ्यासू (हुशार मित्रांशी करावी.
लेखन (लिहून अभ्यास करावा) :
व्याख्या, सूत्र, शब्द, काही विशेष प्रश्न, निबंध, उतारे, इ. लिहून अभ्यास करावा. त्यामुळे शुद्धलेखन सुधारते, लिहिण्याची गती वाढते, हस्ताक्षर सुंदर होते. आत्मविश्वास वाढतो, स्मरणशक्ती संशय दूर होतात, लेखनसामर्थ्य वाढते, पाठांतर लवकर होते, विषय मांडण्याची कला अवगत होते. परीक्षेच्या मर्यादित वेळेत संपूर्ण लिहिणे शक्य होते, विषय स्पष्ट होतो. वाढते,
अ) सुंदर हस्ताक्षर : प्रिय विद्यार्थ्यांनो, परीक्षा जास्त प्रमाणात लेखी असते. लेखी परीक्षेत लेखनकलेला फार महत्त्व आहे. त्यावर वर्षभर केलेल्या परिश्रमाचे फळ अवलंबून आहे. स्पष्ट, सुंदर, व सुवाच्य हस्ताक्षर फार महत्त्वाचे आहे. लेखनाची गती तीव्र करण्याचा अभ्यास पाहिजे, त्यामुळे तुमचे विचार परीक्षकाला वाचणे सुलभ होऊन प्रश्नोत्तराचे मूल्यांकन योग्य होऊ शकते. लेखीप्रमाणेच मौखिक परीक्षासुद्धा असतात. मौखिक परीक्षेत समर्पक उत्तरांची अपेक्षा असते. No more no less.
ब) टीपा: टीपा घेत अभ्यास केल्यास मनाची एकाग्रता वाढते. विषय लवकर व निश्चितपणे कळतो. पाठात काय महत्त्वाचे आहे याचे आकलन होते. झोप येत नाही.
क) टीपा काढणे एक कला : पाठ पूर्ण वाचून नीट समजल्यानंतर त्या- पाठातील महत्त्वपूर्ण भाग थोडक्यात पण स्पष्ट लिहून काढा. ठीपा
पुढील प्रकारे अनेक टप्प्यांत काढाव्यात. –
१) पुस्तक हे एक अतिसविस्तर टीपांचे प्रतीक आहे.
२) सविस्तर टिपा.
३) संक्षिप्त टिपा.
४) अतिसंक्षिप्त टिपा. (Notes at a glance)
पुस्तकात जर १०० ओळी असतील, तर ‘सविस्तर टिपां’ मध्ये सुमारे ३० ओळी असाव्यात, व संक्षीप्त टीपांमध्ये १० ओळी असाव्यात. जर तो पाठ नीट कळला असेल, तर तसे करणे संभव आहे. सविस्तर टीपा न घेतासुद्धा संक्षीप्त टिपा घेऊ शकता. संक्षिप्त टिपांशिवायसुद्धा अतिसंक्षिप्त टिपा घेऊ शकता. ही प्रत्येकाची व्यक्तिगत इच्छा, सुविधा व वेळ यांवर अवलंबून आहे.
टिपांमुळे मोठे काम छोटे होते व त्या भागाची आवृत्ती करणे सुलभ होते. पाठांतर शक्य होते. अभ्यासाचा आटोप येतो. थोड्या वेळात व परिश्रमात अधिक अभ्यास होऊ शकतो. ”How to study -अभ्यास कसा करावा?”
अतिसंक्षिप्त टिपा: अतीसंक्षिप्त टिपांमध्ये (१) पाठातील अथवा प्रश्नातील केवळ महत्त्वपूर्ण मुद्दे क्रमाने लिहावेत. ऐनवेळी त्याचा विस्तार करुन लिहिता येते. (२) केवळ महत्त्वपूर्ण शब्द (Key words) किंवा अवघड शब्द (Difficult words) किंवा पुन्हा पुन्हा विसरणारे हे शब्द वेगळे लिहून काढावेत. यावरुन सविस्तर लिहिण्यास मदत मिळते. यामुळे सखोल अभ्यास होतो. लक्षात ठेवण्यासारखे काहीही चुकून राहत नाही.
ड) आकृती (Figures) : आकृती काढून तिच्या प्रत्येक भागाला नावे द्यावीत. नावांच्या पुढे त्यांचे कार्य किंवा काही विशेष असल्यास त्यांचा एक-दोन शब्दात संकेत करावा. त्यामुळे कमी वेळात अधिक व संपूर्ण अभ्यास होतो. विज्ञानासारख्या विषयात हे फार उपयोगी ठरते. नंतर आकृतीच्या त्या त्या भागाचे थोडक्यात वर्णन करावे. अधिक लिहिण्याची गरज भासत नाही. मुख्य आकृती काढून झाल्यानंतर ज्या एका अंगाबद्दल विशेष अभ्यास करावयाचा आहे त्या अंगाची एक वेगळी रेखाकृती काढावी. आकृती डाव्या बाजूला व त्याचे थोडक्यात वर्णन करण्याची गरज नाही. पेन्सिलने केवळ रेखाचित्र काढावे. आकृती काढल्यास अधिक लिहिण्याची गरज भासत नाही. आवृत्ती करणे सोपे जाते. शिक्षकाला पण विषय कळण्यास सोपे जाते. A figure is worth one thousand words.
ई) नकाशा : भूगोलात विशेषतः याचा उपयोग होतो. नकाशा काढून त्यात आवश्यक मुद्दे दाखवावेत. एक नकाशा समोर ठेवला की, सारा भूगोल एका दृष्टिक्षेपात येतो. एका नकाशात अनेक विषय किया वेगवेगळ्या विषयांचे वेगवेगळे नकाशे काढावेत.
(इ) प्रतीक (Symbol) : ज्याप्रमाणे सात रंगांना आपण ता नापिहिनिपा जा असे थोडक्यात लक्षात ठेवतो. अशा प्रकारे लक्षात ठेवणे सोपे जाते. तेव्हा आपल्या सोयीनुसार प्रतीक ठरवून लक्षात ठेवावे. पाठांतरासाठी सोयीच्या युक्तया व हातखंडे वापरावेत.
फ) अधोरेषा (Underline) :महत्त्वपूर्ण शब्द, वाक्य, परिच्छेद, पान अथवा प्रकरण यांना लाल पेन्सिलीने चिन्हांकित करावे. वाचनालयाच्या किंवा दुसऱ्याच्या पुस्तकांवर काहीही चिन्हांकित करु नये. शब्द किंवा वाक्याच्या खाली एक सरळ रेषा ओढावी. परंतु पूर्ण परिच्छेद चिन्हांकित करण्यासाठी त्याच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला एक उभी रेषा ओढावी किंवा विशिष्ट चिन्हांचा उपयोग करावा. पूर्ण पानच महत्त्वपूर्ण असल्यास त्या पानाच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात वरील अथवा सोयीच्या चिन्हांचा उपयोग करावा. अशा संकेताने थोड्या वेळात पाठातील महत्त्वपूर्ण भागांची पुनरावृत्ती सुलभ होते. पुस्तक बोलके होते. टिपा काढण्यास वेळ नसेल तेंव्हा ही पद्धत आमलात आणावी. विस्तृत टिपांमध्ये असे अधोरेखांकन केल्यास त्या संक्षिप्त किंवा अतिसंक्षिप्त टिपासुद्धा होऊ शकतात. जेव्हा वेळ अत्यल्प व अभ्यास अत्याधिक असेल, तेव्हा अतिसंक्षिप्त टिपा हे एक रामबाण उपाय आहे. परीक्षेच्या काळात तर अशा टिपा वापरल्यास १००% गुण मिळविणे अवघड नाही. अत्यंत कमी वेळात उत्तम गुण मिळविण्याची ही गुरुकिल्ली आहे. ”How to study -अभ्यास कसा करावा?”
ग) सुत्र (Formula) : महत्त्वपूर्ण सूत्रांचे, वाक्यांचे अथवा शब्दांचे संकलन (संग्रह) करावे. त्यामुळे अतिमहत्त्वपूर्ण भाग दुर्लक्षित होत नाही. परीक्षेपुढे होणारा गोंधळ व ताण टाळता येतो. गणित व विज्ञान यासारख्या विषयांमध्ये सूत्रांचे संग्रह व पाठांतर फार उपयोगी ठरते.
शिका आणि शिकवा :
जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे । शहाणे करुन सोडावे सकळ जन ॥
कांही मुलांचा असा गैरसमज आहे की, जर मी दुसऱ्यांना शिकवले तर त्याचे ज्ञान वाढून तो माझ्यापेक्षा पुढे जाईल, परंतु ज्ञान दिल्याने दुप्पट होते.
अपूर्वः कोऽपि कोशोड्य, विद्यते तव भारति । व्ययतो वृद्धिम् आयाति, क्षयम् आयाति संचयात् ॥ हे विद्या देवी ! तुझे ज्ञान कोष असे अद्भुत आहेत की, ते
दिल्याने वाढते, व संचयाने घटते. म्हणून दुसऱ्यांना स्वतः होऊन शिकवा. वरच्या वर्गातील मुलांनी खालच्या वर्गातील मुलांना शिकवावे. त्यामुळे विषय स्पष्ट होतो. पाठांतर सहज आणि चांगले होते. गंभीर अथवा नवीन तत्त्वांचा बोध होतो. त्या विषयावर अधिकार (Command) येतो. शिकविणे हीच शिकण्याची उत्तम कला आहे.
वाचन : वाचन शुद्ध, समजून, सुस्पष्ट व तीव्र गतीने करण्याची सवय करावी. त्यामुळे थोड्या वेळात अधिक अभ्यास होतो. अर्थाचा अनर्थ होत नाही. विषय कळण्यास सोपे जाते. पाठ नीट समजल्याची खात्री करुन घ्या. अनेकदा समजल्याचा केवळ भास होतो, तसे होऊ देऊ नका. पुटपुटत वाचन केल्यास अवघड विषयसुद्धा सहजपणे कळतो. एकाग्रता वाढते. पाठांतर चांगले व सहज होते.
अभ्यासाची वेळ (Time) : प्रातःकाळी कठीण विषय वाचावेत, (ब) मध्यान्हकाळी सोपे विषय वाचावेत, (क) सायंकाळी अतिसोप्या व आवडीच्या विषयांचे वाचन तथा लेखनकार्य करावे. अर्थात विश्रांती व बुद्धीची ग्रहणशक्ती यांचा विचार करुन अभ्यासाचा विषय निवडावा. (ड) खेळाच्या वेळी खेळावे व अभ्यासाच्या वेळी अभ्यास करावा. एका वेळी एकच काम करावे. (इ) रेडिओ ऐकत. किंवा टी.व्ही पाहत अभ्यास करणे हे चुकीचे आहे. मन एका वेळी एकच काम करु शकते. म्हणून वेळेचा अपव्यय टाळा. याशिवाय दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहणे एक कठीण काम आहे. त्याने विश्रांती मिळत नाही. उलट डोळ्यावर ताण पडून डोळें व डोके थकतात. (फ) नियमित अभ्यासाने कामाचा ढीग साचत नाही. नकळत फार मोठे काम होते. आरोग्य उत्तम राहते. एका दिवसात सारा डोंगर चढून जाणे अवघड असते परंतु रोज एक पायरी चढत जाणे सहज शक्य आहे. Even the longest journey of life begins with the first step म्हणून नियमितपणे अभ्यास करण्याची सवय लावून घ्या.. यामुळे आत्मविश्वास वाढतो. अवघड विषयावरसुद्धा अधिकार येतो. अभ्यासात रुची उत्पन्न होते.
झोप (विश्राम) :
रात्री १० ते ५ या काळातच झोप घ्यावी. पूर्ण विश्रांतीशिवाय चांगला अभ्यास होऊ शकत नाही. अभ्यास विश्राम अभ्यास विश्राम असा क्रम असावा. चहा वगैरेसारखी उत्तेजके प्राशन करुन अभ्यास करणे शारीरिक व बौद्धिकदृष्ट्या हानिकारक आहे. प्रत्येकाने आपापल्या शक्तीसामर्थ्याप्रमाणे अधिक अभ्यास करावा. परंतु त्यासाठी रात्री जागरण करु नये. शरीराच्या गरजेप्रमाणे झोप अत्यावश्यक आहे. याचा अर्थ खूप झोपावे असेही नाही. याचा विवेक प्रत्येकाने आपापल्या परीने करावा. परंतु झोपेत अभ्यास होत नाही हे लक्षात ठेवावे. Early to bed & early to rise, makes a man healthy, wealthy & wise. दूर्भाग्याची गोष्ट अशी की, आज अधिक विद्यार्थी झोपेच्या काळात अभ्यास करतात व अभ्यासाच्या काळात झोपतात. त्यामुळे कांहीच साध्य होत नाही. रात्रीची पूर्ण झोप न मिळाल्यास दिवसभर डोक्यात तणाव (Tension) व डोळ्यात झोप राहते. डोळे दुखतात, डोके दुखते. सर्व आरोग्य बिघडते, यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही. अधिक वेळ अभ्यास केल्याचा, अधिक परिश्रम केल्याचा आनंद होतो, परंतु परीक्षेत चांगले गुण मात्र मिळत नाहीत. कारण झोपेत नीट कळतच नाही आणि कळल्याचा आभास मात्र होतो. म्हणून विद्यार्थ्याना कळकळीची विनंती आहे की, त्यांनी रात्री १० ते ५ या काळात झोपून शिल्लक असलेल्या वेळात सेकंदासेकंदाचा वापर करुन अभ्यास करावा. लक्षात ठेवा-
Save seconds, seconds save minutes, minutes save hours, hours save days, days save weeks, weeks save months, months save years and hence one can save life. ”How to study -अभ्यास कसा करावा?”
मनःशांतीसाठी पूर्ण विश्रांतीची नितान्त गरज असते. म्हणतात ना बाजारात घर असावे, पण घरात बाजार असू नये. बाहेरच्या शांतीपेक्षा आपल्या मनात शांती असायला पाहिजे. मन शांत, स्थिर, उत्साहमय असेल तर भर बाजारातसुद्धा अभ्यास होऊ शकतो.
विद्यार्थ्यात असा गैरसमज आहे की, सकाळी लवकर उठणे शक्य नाही. परंतु प्रयत्नाने सर्व कांही संभव होते. जो रात्री लवकर झोपतो, तो सकाळी लवकर उठू शकतो. सकाळी लवकर उठल्यावर रात्री लवकर झोप येतेच. चांगल्या किंवा वाईट सवयी लावून घेणे आपल्या हाती आहे. शरीर हे सवयीचे गुलाम आहे. तुम्ही एकदा मनाने ठरवा म्हणजे झाले. सुरुवातीला थोडे अवघड वाटते पण नंतर तोच स्वभाव बनून जातो. झोपेच्या काळात अभ्यास म्हणजे आरोग्य व वेळेचा अपव्यय आहे. योग्य वेळी योग्य झोप न मिळाल्यास डोळ्यांची दृष्टी कमी कमी होते. पोटाचे पचन बिघडून पित्त होते, पोटात उष्णता वाढते व वातविकार बळावतो. बुद्धी मंद होते, केस पांढरे होतात, चेहऱ्यावर पुरळ उठतात, चेहऱ्यावरील तेज-ओज नष्ट होऊन चेहरा फिका व निस्तेज होतो. चेहऱ्यावर अकाली वृद्धत्वाची कळा येते. एकंदर या सान्या अनर्थाची परंपरा सुरु होते. ती केवळ एका अवेळी जागरण व अवेळी झोपेच्या सवयीने, जो उशिरा उठणार, तो आसन, प्राणायाम, व्यायाम अथवा प्रातः भ्रमणाला वेळ केव्हा काढणार ? बालपणीच रोगी व कमजोर झालेले शरीर जीवनभर दुःखच देईल. सुदृढ शरीर हेच सुखाचे मूळ कारण आहे. ‘सिर सलामत तो पगडी पचास.’, म्हणून योग्य वेळी योग्य झोप घेतलीच पाहिजे. अन्यथा शारीरिक दुष्परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्यक्ष करुन पाहा ना!
रात्री जागरण केल्याने सकाळी लघवी जास्त गरम व पिवळी होते, वेळेवर शौचास होत नाही, शरीरात आळस व जडत्व येते, चेहरा निस्तेज दिसतो, डोळे जड व लालसर होतात. यावरुन तुम्हाला योग्य वेळी योग्य झोपेचे महत्त्व कळेल. रात्री १० ते ५ या वेळेतील झोप इतर वेळेतील झोपेची तुलना करु शकत नाही. आवश्यकतेपेक्षा कमी झोप ही वेळेची बचत नसून वेळ, शरीर व यश यांची हानी आहे.. एखादा तास अधिक झोप/विश्रांती घेतलात तर अधिक बरे परंतु एखादा तास कमी झोप घेतली तर मात्र पूर्ण दिवससुद्धा नष्ट होऊ शकतो.. म्हणून हा मुद्दा थोड्याशा विस्ताराने देत आहे. याउपर तुमची इच्छा. As you sow, so shall you reap. ‘जैसा करोगे, वैसा ही फल पाओगे ।’ ”How to study -अभ्यास कसा करावा?”
ब्रह्मचर्य :
ब्रह्मचर्याचे पालन करा. ब्रह्मचर्याच्या पालनाने बुद्धी तीव्र होते. सौंदर्य, चेहऱ्यावरील कांती वाढते. आरोग्याची जोपासना होते, आयुष्य वाढते, वीर्य व रज हे बुद्धीचे घटक आहेत. तेव्हा प्रयत्नपूर्वक याचे रक्षण करा. मनाची पवित्रता, व्यायाम, निरंतर व्यस्तता, उच्च ध्येय, सात्त्विक आहार व सत्संग यामुळे ब्रह्मचर्याचे पालन संभव आहे.
अभ्यास स्वतः करा :
त्यासाठी गुरुजनांवर कमीत कमी विसंबून राहा. स्वतः केलेले अध्ययन (Self study) स्थायी असते. सध्या दूर्दैवाने ‘ट्युशन’ ही फैशन झाली आहे. मंद बुद्धीच्या मुलांना ट्युशन ही उपयोगी आहे. इतरांनी स्वतःच अभ्यास करावा व अवघड भाग तेवढा कोणाकडून तरी शिकून घ्यावा. उत्तम ज्ञानप्राप्तीसाठी वेळीअवेळी कोणाचीही मदत घेणे वाईट नाही; पण ट्युशनची सवय वाईट, शक्यतो स्वतःच विषय समजून घेण्याचा प्रयत्न करावा. यामुळे विचार करण्याची शक्ती वाढते. यासाठी बुद्धिबळ खेळणे फार चांगले. विचार करण्यास शिकणे हाच शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. स्पर्धा :
अभ्यासात परस्पर स्पर्धा अवश्य असावी. परंतु ईर्ष्या नसावी. स्पर्धेमुळे अभ्यास जास्त होतो व जिद्द निर्माण होते. Be zealous no a jelous. आपल्या सवंगड्याच्यापुढे जाण्याची तळमळ असावी, पण कोणी पुढे गेल्यास त्याची ईर्ष्या वाटू देऊ नये. ईर्ष्या-द्वेषामुळे तुमची मानसिक शांतता व एकाग्रता नष्ट होते. म्हणून आपला स्वभाव बदलून सर्वांशी प्रेम करायला शिका. इतरांपेक्षा मोठे व्हावे, पुढे जावे अशी -अपेक्षा व महत्त्वाकांक्षा अवश्य असावी, पण आपल्या मोठेपणाचे प्रदर्शन मात्र कधी करु नये. गर्वाचे घर नेहमी खाली असते. Proud doth have a fall. नम्रता हीच ज्ञानी माणसाची ओळख आहे. ‘विद्या ददाति विनयम् ।’ विनयाशिवाय ज्ञानाला अर्थ नाही. 1
Politness costs nothing but pays every thing. Every one should have an ambition but one should not be ambitious.
(प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाकांक्षा अवश्य असावी पण कोणीही महत्त्वाकांक्षी असू नये.) कोणाबद्दल ईर्ष्या, द्वेश बाळगल्यास मनाची शांती व एकाग्रता नष्ट होऊन अभ्यासात अडथळा येतो. म्हणून दुसऱ्याची प्रशंसा करण्यास शिका. मित्र बनवा शत्रू नाही. तरच मन प्रसन्न शांत व एकाग्र राहू शकते.
प्रश्न सोडविणे :
प्रश्न स्वतः सोडविण्याचा प्रयत्न करा. येत नसल्यास विचारा पण सोडविलेल्या प्रश्नांची इच्छा बाळगू नका. त्यांचा तुम्हाला स्थायी लाभ होणार नाही. दिलेल्या प्रश्नाचे उत्तरे शोधण्यापेक्षा नवीन प्रश्न तयार करण्याचा व सोडविण्याचा प्रयत्न करा. यातून तुमच्या विचारशक्तीला चालना मिळते. No pain, No gain. प्रश्न नीट समजणे व त्या प्रश्नाची उत्तरे स्वतः शोधण्यास शिकणे, हेच आपणास शिकायचे आहे. हेच शिक्षणाचे मुख्य ध्येय आहे. जीवनातील कठीण प्रश्नांचे उत्तर शोधत असताना ही विचारशक्तीच कामाला येणार आहे. जेवढी विचारशक्ती अधिक तेवढी माणसाची योग्यता अधिक म्हणून जाणीवपूर्वक आयत्या प्रश्नोत्तरापासून दूर राहा. स्वतः प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रयत्न, विचार, चिंतन करायला शिका. ट्युशन व दुसऱ्यांच्या नोट्स यामध्ये स्वतःला चिंतन व परिश्रम करण्याची संधी अधिक मिळत नाही.. How to study -अभ्यास कसा करावा?
विषयाची आवड :
१) एखाद्या विषयात आवड नाही अथवा अवघड वाटतो म्हणून त्याच्याकडे दूर्लक्ष करु नका. अभ्यास करत गेल्यास आवड निर्माण होते.
२) चांगले शिक्षक मुलांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करु शकतात.
३) चांगल्या पुस्तकांमुळेसुद्धा आवड निर्माण होते.
४) विषय कळू लागला की, आवड निर्माण होते.
५) आवड निर्माण करुन घेण्याची इच्छा असेल तर, आवड निर्माण होते.
६) शिक्षक व विद्यार्थ्यामध्ये परस्पर श्रद्धा व प्रेम असेल तर, होऊ शकते. आवड निर्माण
७) कठीण परिस्थितीमुळेसुद्धा अभ्यासात रुची उत्पन्न होते.
स्वयंप्रेरणा :
अभ्यासात ढोंगबाजी किंवा जोर जबरदस्ती नसावी. स्वयंप्रेरणेशिवाय अभ्यास शक्य नाही.
कळेपर्यंत अभ्यास करणे :
एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करणे यालाच अभ्यास म्हणतात. अभ्यास हा निरंतर दिर्घकाल, श्रद्धापूर्वक केले जाणारे कार्य आहे. संत कबीर म्हणतात…करत करत अभ्यास, जडमति होत सुजान,
रसरी आवत जावत हे, सील पर परत निसान ॥ अर्थात, Practice makes man perfect म्हणून कळले तरच अभ्यास करावा असे नाहीं, अपितू कळेपर्यंत अभ्यास करावा. एखादी गोष्ट मला कळणारच नाही असे समजू नये. एखाद्याला, गोष्ट पाच वेळ वाचली की कळते, तर तीच गोष्ट एखाद्याला कळायला पंचवीस वेळा वाचावे लागते एवढेच. परंतु कळणारच नाही, असे कदापि नाही. काम कठीण आहे म्हणून सोडून देऊ नका. कठीण काम करण्याची जिद्द | बाळगा. सोपी कामे सगळीच करतात, त्यात विशेष असे आहे तरी काय? म्हणून कठीण विषयाकडे डोळेझाक करु नका. उलट कठीण वाटणाऱ्या विषयाला अधिक वेळ द्या व त्या विषयाला अगोदर अभ्यासा. असे विषय प्रातःकाळी, मन व बुद्धि शांत व प्रसन्न असताना अभ्यासावेत. थकलेल्या अवस्थेत अथवा झोपेच्या वेळी कठीण विषय अभ्यासू नयेत, अन्यथा ते अधिक अवघड वाटू लागतील. ज्या ज्या विषयांची/प्रकरणांची भीती वाटते त्या त्या विषयांना त्यांची भीती जाईपर्यंत अभ्यास करावा. भीती जाईपर्यंत अभ्यास करण्याची जिद्द बाळगा. त्यासाठी आवश्यक गुरु, मित्र व पुस्तकांची मदत घेण्यात संकोच बाळगू नये. भीती जाईपर्यंत अभ्यास करण्याची जिद्द बाळगून काम न केल्यास वरचेवर आत्मविश्वास कमी होऊन कामाचे बळ मंदावते. यांचा मन व शरीरावर विपरीत परिणाम होऊन जीवनात निराशा येते. म्हणून कठीण विषयाचा अभ्यास कळेपर्यंत करा. ”How to study -अभ्यास कसा करावा?”
पाठांतर :
महत्त्वपूर्ण व्याख्या, शब्द, सूत्रे, मुद्दे व क्रमवार पाठ करावे. जेवढे अधिक पाठांतर असेल तेवढे चांगले; परंतु समजून पाठ करावे, न समजता पाठ केल्यास ऐन वेळी विसरण्याची शक्यता असते. पाठांतर करुन गेल्यास स्मरणशक्ती वाढत जाते. म्हणतात ना-
“विद्या ओठी व पैसा गाठी. ‘
पुस्तकस्थाच या विद्या परहस्तं गतं धनम् ।
कार्यकाले समुत्पन्ने न सा विद्या न तद्धनम् ॥
पाठांतराने परीक्षेत अधिक गुण मिळतात, वेळेची बचत होते, यथायोग्य लिहू शकतो. पाठांतर करण्याचे टाळू नये, पाठांतर नेहमी पूरक ठरते.
पाठांतराची पद्धत (स्मरणशक्ती) :
१) पाठांतराचा भाग नीट वाचून समजून घ्या.
२) त्यातील मुद्दयांचा क्रम लक्षात घ्या.
३) पुन्हा त्यातील वाक्यरचनेवर लक्ष द्या.
४) मोठ्याने अगर पुटपुटत ५ ते १० वेळा वाचा.
५) पहिल्या दिवशी थोडा वेळ वाचून ठेवावे व दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी पाठांतर होईपर्यंत वाचत राहावे.
६) मधून-मधून डोळे बंद करुन विषय आठवण्याचा प्रयत्न करावा. थोड्या-थोड्या वेळाने वा रोज अठवण्याचा प्रयत्न करावा. ‘अनभ्यासे विषं विद्या.’ मनुष्य विस्मरणशील आहे. म्हणून सदैव पाठांतरीत भागाची आवृत्ती करत राहावे.
७) पाठांतर करत गेल्यास पाठांतराचे सामर्थ्य वाढते.
८) स्मरणशक्ती वाढविण्यासाठी त्या विषयात आवड निर्माण करावी. आवडीचा विषय लवकर लक्षात राहतो.
९) दूध, तूप, फळे, भाज्या व सात्त्विक आहार घ्यावा. गायीचे दूध व तूप घेतले तर फारच उत्तम.
१०) सारसत्त्वारिष्ट, अश्वगंधारिष्ट, ब्राह्मीधृतसारखी आयुर्वेदीक औषधे घ्यावीत.
११) हलका, साधा ऋतानुकूल आहार घ्यावा. पचण्यास कठीण, तेलकट, शिळे, अति उष्ण, अति थंड पदार्थ खाऊ नये.
१२) थंड पाण्याने आंघोळ केल्याने स्मरणशक्ती वाढते.
१३) आसन, प्राणायाम, प्रातः भ्रमण नियमितपणे करत रहावे. त्यामुळे शरीर निरोगी राहून बुद्धीची ग्रहणशक्ति वाढते.
योजनाबद्ध रीतीने अभ्यास करावा. सर्व विषयांना आवश्यक तेवढा वेळ मिळाला पाहिजे. एखाद्या विषयाला जास्त वेळ व एखाद्या विषयाला कमी वेळ असे होऊ नये. कठीण विषयाला अधिक वेळ द्यावा. रोजचा अभ्यास रोज झालाच पाहिजे. कधी उरलाच तर रविवारी तो पूर्ण करुन घ्यावा. सुट्टीच्या काळात, मागचा पुढचा अभ्यास करुन ठेवावा.
विषय कठीण आहे म्हणून दुर्लक्ष करु नका, उलट त्या विषयाला अगोदर अभ्यासा. डोळेझाक करुन प्रश्न सुटत नसतात. विषय सोपा आहे म्हणूनही त्याकडे दुर्लक्ष करु नका. परीक्षेतील अंकाच्या दृष्टीने दोन्ही विषय समानच आहेत.
अभ्यास करा पण अभ्यासाची चिंता करु नका :
अभ्यास केल्याने चिंता राहणार नाही व चिंता केल्याने अभ्यास होणार नाही. उलट विश्वास कमी होतो. निराशा वाढते, चिंतेने शरीर रोगी व अशक्त होते, बुद्धी मंद होते, अभ्यासाची भीती बाळगू नका.. चिंता करुन प्रश्न सुटत नसतात. उलट वाढतात. होणारा अभ्याससुद्धा होत नाही.
अभ्यासाच्या विषयांचे वर्गीकरण करा (Classification) :
त्यातील विषय, उपविषय, मुद्दे यांची विभागणी करुन क्रम लावा. असे केल्याने विषय स्पष्ट होऊन लक्षात ठेवण्यास सोपे जाते. ही अभ्यासाची शास्त्रीय पद्धत आहे. अभ्यासात विषय परिवर्तन केल्याने थकावट दूर होते. ही एक प्रकारची विश्रांती (Rest ) आहे.
मुलांनी थोडा वेळ तरी अवश्य खेळावे. खेळ त्याच्या शरीर व बुद्धीचे टॉनिक आहे. खेळाने शरीर स्वस्थ व मन प्रसन्न राहते.
भाषेवर प्रभुत्व :
भाषेवर प्रभुत्व (Command) यावे म्हणून नवीन शब्द, सुभाषिते, नवीन वाक्यप्रयोग, यांचा साठा वाढवावा त्यामुळे विचारांची अभिव्यक्ती प्रभावीपणे करता येते. भाषा हेच आपले विचार व भावना दुसऱ्यापर्यंत पोहोचविण्याचे साधन आहे.
सुचिकटाह न्यायाने अभ्यास करावे; अर्थात जर सुई व कढई बनविण्याची दोन कामे एकाच वेळी करायची असल्यास अगोदर सुई बनवून मग कढई बनवीत बसावे. म्हणजेच थोडाथोडका अभ्यास अगोदर करुन घ्यावा, नंतर मोठे कार्य हाती घ्यावे. पहिले कार्य पहिले व नंतरचे कार्य नंतर करावे. Many more people would succeed if they had put first thing first in there life.
दीर्घसूत्री असू नये- अर्थात नमनालाच घडाभर तेल नको. काम करणे थोडे व अवाढव्य योजना आखण्यात सारा वेळ घालविणे ठीक नव्हे. घेतलेले कार्य यथाशिघ्र तडीस लावण्याची सवय बाळगावी. उगीच फार चांगले काम करण्याच्या नावाखाली कामाचे घोंगडे वर्षानुवर्षे भिजत ठेवू नये. लहान लहान योजना बनवून त्या जोमाने पूर्ण करत गेल्यास उत्साह वाढतो. मोठ्या योजना आखून त्या अर्धवट ठेवण्याने कामाचा उत्साह कमी होतो. ”How to study -अभ्यास कसा करावा?”
विद्यार्थ्याचे प्रमुख कर्तव्य आपले आरोग्य व ज्ञानार्जन आहे, परंतु विद्यार्थी या कामातील वेळ काढून इतर अनेक कामात स्वतःला गुंतवून घेतात त्याचे कोणतेच काम नीट होत नाही. एक ना धड, भारभर चिंध्या काय कामाच्या.’ म्हणून प्रिय विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा,
तुमची संपूर्ण शक्ती केवळ तुमचे आरोग्य व ज्ञानवर्धन यावर केंद्रित करा. एकदा हे बालपण निघून गेले की, पुन्हा काहीच जमत नाही. काही स्वार्थी किंवा अज्ञानी लोक आपल्या स्वर्थापोटी मुलांना इतर कामात लावतात. हे मुलांचे शत्रू आहेत. आता आमच्या सरकारी डोक्याप्रमाणे लग्न करुन घर सांभाळायला वयाची अट २१ वर्षे आहे; पण वोट देऊन देशाचे भविष्य ठरवायला मात्र केवळ १८ वर्षे पुरे आहेत. ज्यांच्यामध्ये छोटेसे घर सांभाळायची बुद्धी नाही, तो राज्य कसा सांभाळेल? अस्तु. विद्यार्थ्यांनी आपल्या शक्तीचे विकेंद्रिकरण करु नये. विद्यार्थ्यांनी राजकारणाचा अभ्यास करावा; परंतु प्रत्यक्ष राजकारणात भाग घेऊ नये. समाजकारणातही भाग घेऊ नये. केवळ आपल्या ध्येयावर दृष्टी ठेवून तन, मन, धनाने ध्येय साध्य करावे.
अभ्यास करत असताना, शरीर, मन अथवा बुद्धी थकले अथवा कंटाळा आला तर –
१. थोडा वेळ शवासनामध्ये पडून विश्रांती घ्यावी.
२. विषय बदलावा.
३. इतर विरंगुळ्याची/आवडीची कामे करावीत.
४. आवडीचे खेळ खेळावेत.
५. अध्ययन कक्षाच्या बाहेर थंड व मोकळ्या हवेत फिरावे.
६. थंड पाण्याने तोंड हात-पाय धुऊन तोंडात पाणी भरुन डोळ्यावर पाणी शिंपडावे. त्यामुळे आळस दूर होऊन संपूर्ण शरीरात नवीन चैतन्य येते.
७. आवश्यकता असल्यास थोडा वेळ झोपावे.
८. मनोरंजन करावे.
एकाग्रता (Concentration of mind):
मनाचा स्वभाव चंचल आहे. ते स्थिर कधीच राहू शकत नाही. भल्या किंवा वाईट कामात ते सदैव व्यस्त असते. अपेक्षीत कामात मनाला अधिक वेळ गुंतवून ठेवण्यास मनाची एकाग्रता म्हणतात. एकाग्रता म्हणजे गतिशून्यता नव्हे. आपले मन कुठेच लागत नाही असे नाही. अनावश्यक किंवा आवडीच्या कामात ते लागतेच; पण हव्या त्या कामात लागत नाही, एवढेच काय ते. आपले मन चित्रपट पाहण्यात तासनतास लागते; पण अभ्यासात मात्र लागत नाही. मन एकाग्र करण्याचे उपाय-
१) पतंजलीच्या योगदर्शनाप्रमाणे अष्टांगयोग म्हणजे- यम, नियम, आसन, प्राणायाम, ईश्वरप्रणीधान, धारणा, ध्यान, नि समाधी- हा मनाच्या वृत्तीचा निरोध (संयमन) करण्याचा उपाय आहे. ”How to study -अभ्यास कसा करावा?”
(२) गीतेत श्रीकृष्णाने सांगितले आहे – ” अभ्यासेन तु कौंतिय, वैराग्येण च तु गृहयते” अर्थात, अभ्यासाने (प्रयत्नाने) मनाला एकाग्र करणे संभव आहे.
३) ‘जैसा खाये अन्न, वैसा बने मन’ – जर केवळ सात्त्विक भोजन (दूध, 1 दही, तूप, फळे, भाज्या इ.) केल्यास मनाची चंचलता कमी होते व मन अपेक्षित कार्यात लागते. राजसिक अन्न (मसालेदार, चटण्या, तेलकट, मांसाहार, अंडी, कांदा, लसुन, लोणची, चीज इ.) खाल्ले की मन चंचल होते.
४) डोळे बंद करुन मनाला पुन्हा पुन्हा अपेक्षित विषयात लावण्याचा प्रयत्न करावा.
५) अनावश्यक विषयाचे चिंतन करुन सोडून देण्यास मनाला बाध्य करावे. अर्थात चांगल्या व इष्ट कामात मन लावत गेल्यास वाईट व अनिष्ट कामापासून ते आपोआपच दूर जाते.
६) मनाला सतत व्यस्त ठेवावे, रिकामे वेळीच मन नको तिथे भटकत असते..
(७) चर्चा व लेखन करुन अभ्यास केल्यास त्यात मन चटकन लागते.
८) पहाटेच्या वेळी मन सहजच एकाग्र होते.
९) मौन बाळगण्याच्या अभ्यासानेसुद्धा मन स्थिर व शांत राहते.
१०) एकाग्रतेमध्ये बाधक विषयांना अगोदर संपवा. चिंता किंवा निराशा वाढविणारे कार्य प्रथम संपवून टाका म्हणजे मन सहज एकाग्र होईल.
(११) अभ्यासासाठी जमिनीवर सिद्धासन, वज्रासन, वा स्वस्तिकासनात बसावे. जेणेकरून तासभर तरी स्थिती बदलण्याची अवश्यकता पडू नये. पुढे वाकून, झोपून, पालथे निजून इ. अवस्थेमध्ये अभ्यासाला बसू नये. अन्यथा पाठ व कंबर दुखू शकते. डोळ्यांची दृष्टी कमी होते.
पाठ्यपुस्तकावरच निर्भर राहू नये, अवांतर वाचनाची सवय वाढवावी.प्रकाश नेहमी डाव्या बाजूने पडेल याची दक्षता घ्या. अति कमी किंवा अत्याधीक प्रकाशात वाचन केल्यास डोळे खराब होतात.
तासभराच्या वाचनानंतर डोळ्याला थोडी विश्राती द्यावी. डोळे बंद करुन दोन्ही हातानी हळुवारपणे डोळे चोळावेत. थंड पाण्याचा डोळ्यावर शिडकावा करावा. असे करताना तोंडात पाणी भरुन घ्यावे. रोजच नेत्रस्नान करावे. त्याने डोळ्याचे आरोग्य चांगले राहते. डोळ्यात विशेष प्रकारचे तेज येते. सतत ३-४ तास अभ्यास करुन डोळ्यावर ताण पडू देऊ नये.
अभ्यास करीत असताना प्रत्येक तासा-दोन तासाने ५ ते १० मिनिटे विश्राम करावा. म्हणजे आकलनशक्ती वाढते. वाचलेला भाग डोळे बंद करुन आठवण्याचा प्रयत्न करावा किंवा १० मिनिटे शवासनामध्ये पडून राहावे. अशा प्रकारे शारीरिक व बौद्धिक विश्रांती मिळून शक्ती पुन्हा संग्रहीत होते. ज्या प्रकारे बॅटरी रीचार्ज होते. अभ्यास करणे ही विद्यार्थ्याची गरज आहे. न की शिक्षकांची अथवा माता-पित्यांची म्हणून आपली जबाबदारी इतरांवर टाकू नये.
अभ्यासाची जागा अथवा खोली ही एकांत, स्वच्छ व प्रसन्न असावी. घरी ते शक्य नसल्यास वाचनालयाचा लाभ घ्यावा. बाहेर अंगणात, झाडाखाली, शेतात, बागेत वगैरे ठिकाणीसुद्धा अभ्यास एकाग्रतेने होऊ शकतो.
अभ्यासाचे साहित्य सोबत घेऊनच अभ्यासाला बसावे, म्हणजेच मध्ये उठण्याची पाळी येत नाही.
अभ्यासाचे वेळापत्रक तयार करुन त्याप्रमाणे अभ्यास करण्याचा काटेकोर प्रयत्न करावा. परंतु कधी-कधी काही कारणास्तव त्यात व्यत्यय आला अथवा खंड पडला म्हणून वेळापत्रकाप्रमाणे अभ्यास करणे थांबवू नये. पुन्हा नवीन जोमाने कार्यक्रमास लागावे. चालताना पाय घसरुन पडलो म्हणून पडून राहायचे नसते, श्रेयस्कर आहे. आवश्यकतेनुसार कार्यक्रम बदलत राहावे. दैनंदिनी उठून चालणेच | बनवून त्यात उद्याचा कार्यक्रम आज रात्री बनवून झोपावे. सकाळी उठल्यानंतर आता काय करु? असा प्रश्न नको. महत्त्वाचे कार्ये अगोदर व इतर कार्य नंतर अशा क्रमाने, उद्या करावायची कामे लिहून ठेवावीत. ”How to study -अभ्यास कसा करावा?”
जर कांही काम अभ्यास जर पूर्ण नाही झाले तर त्यांना उद्याच्या कार्यक्रमात लिहावे. त्यामुळे कामाचा विसर पडत नाही व सर्व कामे यथासमय होऊ शकतात. जीवनामध्ये दैनंदिनी लिहिण्याचे फार महत्त्व आहे. त्यामुळे जीवन सुव्यवस्थित (Well organised) होते. दैनंदिनीमध्ये आपले अनुभव, घटना वगैरेसुद्धा आपण लिहू शकतो. जीवनामध्ये खूप कांही करुन खूप मोठा बनण्याची इच्छा असेल, तर दैनंदिनी लिहिणे एक सर्वोत्तम उपाय आहे. ज्यांना जीवनात खूप कांही करुन दाखवण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी दैनंदिनी लिहिणे व उद्याचा कार्यक्रम आज तयार करुन त्यानुसार कार्य करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. अभ्यास करणे व दैनंदिनी लिहिणे ही दोन्ही कामे यथासमय करण्यामध्ये बहुधा अडथळे येतात. ‘शेंडी तुटो कि पारंबी तुटो’, असा दृढनिश्चय केल्याशिवाय अशी कामे होत नसतात. तथापि ‘अति तिथे माती’ होऊ देऊ नये. अन्यथा ‘तूपही गेले आणि मापही गेले’ अशी अवस्था येऊ नये.
सर्वत्र विवेक (Balance) सांभाळून कामे करावे. सर्वच नियम सर्वांना समान उपयोगी पडतील असे नाही; कारण प्रत्येकाची प्रकृती, परिस्थिती, वेळ वगैरे भिन्न आहेत. प्रत्येकाने आपापल्या सोईनुसार नियमांचे चयन व पालन करावे. अशी नम्र प्रार्थना आहे.
आरोग्य की अभ्यास असा पर्याय वा परिस्थिती आल्यास अगोदर आरोग्य व नंतर अभ्यास असा क्रम ठेवावा. आरोग्याची उपेक्षा काहीच साधत नाही. आरोग्य ठीक असेल, तर सर्व कांही करणे शक्य आहे. आरोग्य हेच सुखी जीवनाचे प्रथम साधन आहे. कालिदासाने म्हंटले आहे. – “शरिरम् आद्यं खलु धर्म साधनम् ”
गृहपाठात अधिक वेळ घालवू नये, गृहपाठ झाला की, अभ्यास झाला असे नाही. कमीत कमी वेळात अधिक व सुंदर गृहपाठ करावा. जेवणानंतर आर्धा तास तरी अभ्यास करु नये. दुपारी जेवणानंतर वामकुक्षी घ्यावी. संध्याकाळी जेवणानंतर शतपावली करावी. संध्याकाळचे जेवण नेहमी हलके, अल्प व नियमित असावे.
स्वतःची चाचणी परीक्षा स्वतःच घ्या, स्वतःलाच प्रश्न विचारा व स्वतःच उत्तरे द्या. चिकित्सक बना, सर्वत्र का, कसे, कोणते, काय, केव्हा ? असे प्रश्न विचारुन समजून घ्या. आंधळ्यासारखे कांहीही मान्य करुन चालू नये, म्हणून “Enquire and Learn”. ‘बाबा वाक्य प्रमाणम्’ नसावे. ”How to study -अभ्यास कसा करावा?”
निबंध लिहिण्यापूर्वी त्या विषयाचे मुद्दे संकलित करा. मिळतील तसे मुद्दे नोट करत चला; त्या विषयावर गुरुजनांशी व इतरांशी चर्चा करा. चर्चेतील मुद्द्यांची नोंद करा. आवश्यक पुस्तके वाचा, स्वतः विचार करुन कांही मुद्दे त्यात सुचिबद्ध करा. नंतर निबंधाचे टप्पे अथवा क्रम ठरवून मुद्दयांचे तद्नुसार क्रमवार विभाजन करावे. नंतर एक-एक, लहाण-लहाण विचार त्याच क्रमाने लिहीत चला. अर्थात, सामग्री एकत्र करा. त्याचा क्रम निश्चित करा. विषयाचे वर्गीकरण केले की, विचारांची मांडणी सुसंबद्ध होते. विषयाला अनुसरुन म्हणी, सुभाषिते, महापुरुषांचे विचार पुष्टीसाठी देत जावे..
इंग्रजी भाषा भारतीय मुलांना फार अवघड वाटते; कारण ती मातृभाषेप्रमाणे आपल्या व्यवहारात येत नाही. याशिवाय इंग्रजी शिकविण्याची पद्धत सदोष आहे. भाषेचे दोन भाग आहेत, एक बोलणे व दुसरे लिहिणे. दोघांमध्ये थोडा भेद आहे, पण दोघात मुलभूत गोष्टी सारख्याच असतात. शब्दाची अर्थपूर्ण योजना म्हणजे वाक्य आपण वाक्यात बोलतो. पहिली गरज आहे शब्द व त्याचा अर्थ याचे ज्ञान. दुसरी गरज आहे वाक्यरचना शब्दार्थानंतर भाषेतील ‘शब्दांचे प्रकार’ अर्थात Parts of speech व वाक्यरचनेचे नीट ज्ञान झाल्यास कुठलीही भाषा लिहिणे व बोलने सोपे होते. परंतु आज भाषेच्या व्यावहारिक | तत्त्वावर भर दिला जात नाही. त्यामुळे सर्व व्याकरण, ‘शब्दार्थ’ इ. शिकूनही मुलांना इंग्रजीमध्ये चार वाक्यसुद्धा लिहिता-बोलता येत नाहीत. सर्वत्र जगाचा असा अनुभव आहे की, तीन महिन्यात कोणतीही भाषा शिकता येते. तीन नाही सहा महिन्यात तरी यायला कांही हरकत नाही. पण जोपर्यंत काळ (Tense) नीट येणार नाही, तोपर्यंत इंग्रजी येणार नाही. इंग्रजीचे इतर व्याकरण Voice, Direct indirect सुद्धा काळाच्या आधारेच स्पष्ट होऊ शकते. Tenses चा लिहून व बोलून इतका अभ्यास झाला पाहिजे की, तुम्ही सहजपणे त्याचा ठीक वापर लिहिण्यात व बोलण्यात करु शकले पाहिजे. तदनंतर वाक्यरचना (Syntex), वाक्यप्रचार (Phreses), मुहावरे (Idioms) याचा अभ्यास करावा. भाषेच्या बाबतीत हे लक्षात ठेवावे की, जोपर्यंत ते शब्द, वाक्य, वाक्यरचना व वाक्यप्रचार, काळ व्यवहारात आणणार नाहीत; तोपर्यंत तो भाग तुमच्या उपयोगाचा होऊ शकत नाही. मराठी-इंग्रजी, इंग्रजी- मराठी असा अनुवाद करण्याचा सराव करावा. परस्पर मित्रांमध्ये बोलण्याचा प्रयत्न करावा. त्यात संकोच करु नये, स्वतः बोलण्याचा व लिहिण्याचा प्रयत्न करा, येत नसलेले शिकत जा. न समजता केवळ पाठांतरावरच अवलंबून राहू नये. परंतु समजून केलेले पाठांतर परीक्षेच्या दृष्टीने नेहमीच महत्त्वाचे असते. कांही वाक्य पाठ करुन त्यांचा व्यवहारात, लिहिण्यात, व बोलण्यात उपयोग करत जा. शब्द भांडार वाढविणे, तथा स्पेलिंग पाठ करणे हे केवळ पाठांतराचे विषय आहेत. सतत अभ्यासाने कोणत्याही विषयात कौशल्य प्राप्त करता येते. इंग्रजीमध्ये शब्दोच्चारण व स्पेलिंग्ज यात आवश्यक संगती नसल्यामुळे उच्चारण व स्पेलिंग पाठ करण्यासाठी एक छोटासा शब्दकोश सदैव सोबत ठेवावा.
प्रत्येकाने आपल्या मातृभाषेतच शिक्षण घ्यावे. परकीय भाषेत विषय चांगल्या प्रकारे रुळत नाही. अनेक भाषा आवश्यक शिका; परंतु शिक्षणाचे माध्यम परकीय भाषा कधी असू नये. आज भारतामध्ये मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याची प्रथा वाढत आहे हे एक दुर्भाग्यपूर्ण आहे.”How to study -अभ्यास कसा करावा?”
अभ्यास किती करावा ?’ असा प्रश्न नेहमीच विद्यार्थी विचारतात. – हा प्रश्न असाच आहे की, मी भाकरी किती खाऊ? हा प्रश्न वैयक्तिक स्वरुपाचा आहे. व्यक्ती, वेळ, मन, व शरीर वगैरेवर अवलंबून आहे. त्यामुळे निश्चितपणे काहीच सांगता येणार नाही. साधारणपणे कांही गोष्टी सांगता येतील – उदा: ‘जेवढे पचेल, तेवढेच खा.’ जितका वेळ एकाग्रतेने अभ्यास होऊ शकतो तेवढा वेळ अभ्यास करा. अभ्यासात चित्त नसताना अभ्यासाच्या नावाखाली घंटे मोजत बसू नका. अभ्यासात लांबी महत्त्वाची नाही, खोली अर्थात, समज महत्त्वाची आहे. कधी अभ्यास अधिक होईल, तर कधी कमी होईल; हे त्या त्या परिस्थितीवर अवलंबून आहे. त्यावर तुमचा अधिकार नाही; पण तशी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. इथे ‘अधिकस्य अधिक फलम्.’ लागू पडते. शरीर, मन, बुद्धि हे थकत असतात म्हणून योग्य वातावरण, विश्रांती; लक्षात घेऊनच अभ्यास केलेले बरे. अभ्यासात लक्ष नसताना अभ्यास केल्याने उपयोग होत नाही. उलट सोपे विषय अवघड वाटून त्या विषयाची भीती वाटू लागते. कोणत्याही कामाची अति बरी नसते, अन्यथा त्या कामात अरुची उत्पन्न होऊन शनैः शनैः आत्मविश्वास कमी होऊ लागतो. अन् मग सगळे मुसळ केरात, मुंड कुऱ्हाडीने एखादे झाड तोडण्यास चार तास लागत असतील, तर तीक्ष्ण कुऱ्हाडीने तेच झाड एका तासात तोडू शकता येते. म्हणून चार तासाचे काम एका तासात करुन आपल्या परिश्रमाची व वेळेची बचत करतो. हे प्रत्यक्ष करुन पाहा. शरीर, मन, बुद्धी सतेज ठेवून अभ्यास केल्यास चार तासाचा अभ्यास एका तासात होऊन वेळ व परिश्रम यांची बचत होते. दैवयोगाने तुमच्याकडे अधिक वेळ असला, तरी शारीरिक व बौद्धिक परिश्रमाला मर्यादा आहेत. म्हणून सदैव शरीर व बुद्धीला सतेज ठेवण्यासाठी आवश्यक उपाय केलेच पाहिजेत, याला पर्याय नाही. आवश्यक विभाग तथा खेळ हे शरीर व बुद्धी यांना सचेत ठेवण्याचे प्रमुख उपाय आहेत, हे विद्यार्थी मित्रांनी नीट लक्षात ठेवावे असा प्रेमाचा आग्रह आहे. बुद्धी थकलेली असतानासुद्धा शारीरिक श्रम करणे शक्य आहे, परंतु अभ्यास करणे शक्य नाही. खेदाने सांगावेसे वाटते की, अनेक विद्यार्थी या मुद्द्याकडे लक्ष देत नाहीत. अन् जीवापाड परिश्रम करूनसुद्धा त्यांना परीक्षेत अपेक्षित गुण मिळत नाहीत. How to study -अभ्यास कसा करावा?
विद्यार्थ्यांसाठी अभ्यास हे सतत करण्याचे कार्य आहे. म्हणून वरील उपाय महत्त्वाचे आहेत. हा अभ्यासाचा कार्यक्रम केवळ एक दिवस अथवा एका आठवड्यापुरताच असता तर प्रश्न वेगळा होता. म्हणून या सर्व गोष्टी लक्षात घेऊन जेवढा वेळ अभ्यास करणे शक्य होईल तेवढाच वेळ अभ्यास करावा. त्यातूनच तुमचे सुंदर स्वप्न साकार होणार आहे. प्रत्यक्ष करुन तरी पाहा ना.
Comments are closed.